Friday, 28 August 2020

क्षणभंगूर...

परवा एका मित्राच्या काकांचं निधन झालं. त्यानिमीत्ताने आयुष्य किती क्षणभंगुर आहे ह्याचा पुनश्च एकवार प्रत्यय आला. कालपर्यंत जी व्यक्ती आपल्या सोबत चालत बोलत होती ती आजपासून आपल्यासोबत नाही. ही भावना किती भयावह आहे. ज्या व्यक्तीचं असणं आपल्यासाठी महत्वाचं असतं त्या व्यक्तीशिवाय पुढचं आयुष्य कसं कंठणार हा ही विचार त्यामागे असतो.


आपण काय आहोतच की रे... अरे आपल्याला काय होतंय... रोजचं आयुष्य जगतांना आपलं असणं हे आपण काय, वा इतरांनी काय गृहित धरणं किती चुकीचं आहे ह्याचा प्रत्यय पदोपदी येतो. घरातून कामासाठी म्हणून बाहेर पडणारा मनुष्य धड्याअंगानं घरी जाईलच याची शाश्वती नसते. पूर्वी काय झालं आणि उद्या काय होईल ह्या विचीत्र अवस्थेत राहून आपण आपलं जगणं कष्टी करत असतो. याचा अर्थ असा नाही की अगदी सर्वसंगपरित्याग केलेल्या माणसासारखं वागाव. परंतू वास्तवाचं भान असणं गरजेच आहे. उद्यासाठी हे हवं ते हवं... असं म्हणून रोजच्या जीवनातला आनंद न उपभोगणं, सदैव चिंतायुक्त आयुष्य जगणं ह्यासारखा दूसरा मूर्खपणा नाही. कवी, गीतकार श्री. संदीप खरे त्यांचा एका कवितेत सुरेख शब्द आहेत. ते म्हणतात की, "उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून... पर्वा आहे उद्याच नंतर..." माझं भविष्य सुखकर व्हायला हवं. मी सुखात रहायला हवं हे अगदी योग्य आहे. परंतू, आज अपरिमीत कष्ट करून जो उद्या मला भविष्यात उपभोगायचा आहे त्याचा आनंद उपभोगण्यासाठी जर मीच राहिलो नाही तर काही उपयोग आहे काय?


आपलं आयुष्य किती असतं? ह्या प्रश्नाचं माझ्यादृष्टीने एकच उत्तर आहे. आणि ते म्हणजे एका क्षणाचं. आनंद सिनेमामध्ये असलेला एक संवाद हेच तर सांगतो की, "बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहीये लंबी नही." वास्तविक आयुष्यात जगत असताना ते आयुष्य एकेका क्षणामध्येच असतं. जो क्षण आज, आत्ता आहे तो नंतर नाही. सुखं, दुःख हे कायमचे नाहीत तर फक्त क्षणाचेच आहेत. त्यांचा पाठशिवणीचा खेळ हा कायम सुरूच राहतो. आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही चांगल्या-वाईट घटना कायमच्या नसतात. आपल्या आवडत्या वा नावडत्या व्यक्तीचा सहवाससुद्धा कायमचा नसतो. आपल्याला हवे ते पसंतीचे क्षण जर का, जेव्हा हवे तेव्हा जगता येणार असतील तर आयुष्य एकसुरी होऊन जाईल. खरंतर आयुष्याचं सौंदर्य ह्या क्षणभंगुरते मध्येच आहे. जे शाश्वत नाही, जे कायम नाही तेच आयुष्य आहे. आणि तेच सुंदर आहे.



हे सर्व ध्यानात घेतलं तर काय मौज येईल हो... अस्तु...


इती लेखनसीमा...

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

Friday, 21 August 2020

व्यक्त होणं...


हे व्यक्त होणं म्हणजे नेमकं काय?

याचे नेमके प्रकार तरी किती?

याचे काय आणि कसे परिणाम होतात?

ह्या विषयाला अनेक कंगोरे आहेत. आपण आपल्या आयुष्याबाबत विचार केला तर, खरं तर किती सोप्प असतं व्यक्त होणं. पण थोडं बारकाईनं पाहिलं तर लक्षात येईल की खरंच हे इतकं सोपं असतं का? किंवा आपल्या व्यक्त होण्याचे परिणाम काय होतील याचा कधी विचार केला जातो का? घटना घडली की आपण कशी प्रतिक्रीया देतो? त्वरेनं, त्वेषानं की शांत आणि संयतपणे ह्यावर नक्की विचार व्हायला हवा.

साधी घटना घेऊ की आपल्या घरात एक लहान मूल असतं. आणि मूल म्हटलं की ते त्याच्याच विश्वात रममाण झालेलं असतं. त्याचं विश्व म्हणजे त्याची आई आणि घरातले त्याच्या आजूबाजूला असणारे बाकीचे सदस्य. त्याला नेमकं काय हव असतं तर आपलं लक्ष सतत त्याच्याकडे कसं असेल. त्यासाठी ते नानाविध क्लूप्त्या अवलंबत. म्हणजे अगदी लहान मूल भूक लागली तर रडेल, खूष असलं तर हसेल. थोडं मोठ मूल ज्याला हळू हळू चालता, बोबडे बोल बोलता येत असतील तर ते त्यापरीनं वागेल. महत्वाचं काय असतं की आपण ज्यापद्धतीनं त्याच्याशी वागू तसं ते वागत असतं. अर्थात व्यक्त होतं. त्यानं आदर्श मुल, विद्यार्थी, जबाबदार नागरिक, सुजाण पती/ पत्नी व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर आपणच विचार करायला हवा. म्हणजे जशी आपली वागणूक असेल तसंच त्याचं व्यक्तीमत्व घडेल (अर्थात व्यक्त होईल) हे ध्यानी ठेवायला हवं.

व्यक्त होण्याची सामाजिक बाजू पाहिली तरी न राहवून मुंबईमध्ये घडलेली घटना नजरेसमोर आल्यावाचून राहत नाही. घटना घडली त्याची तारीख होती ती तारीख १२ ऑगस्ट २०12. रझा अकादमीच्या पुढाकारानं मुंबईमध्ये आझाद मैदानाजवळ १५०० माणसं जमून म्यानमार मध्ये घडलेल्या घटनेचा म्हणजेच तेथील बौद्ध नागरिक आणि तिथे बाहेरून गेलेले रोहिंग्या मुस्लिम ह्यांच्या मध्ये उसळलेल्या दंगलीचा निषेध करणार होते. अर्थात त्याबाबत खूप काही लिहीलं गेलं आहे. आपण त्याबाबतची सारी माहिती आंतरजालावर पाहू वाचू शकता. ईथे त्याचा फक्त उल्लेख केला तरी पुरेसा आहे. एकत्र येणं, निषेध करणं इथवर सारं काही ठिक होतं. पण १५०० लोकांच्या जमण्याची सुचना देऊन ४०,००० हजार लोक जमले आणि त्या निदर्शनांना जे हिंसक वळण दिलं गेलं ते अत्यंत चुकीचं होतं. त्या घटनेचा थेट आणि दूरगामी परिणाम ज्या समाजघटकांवर, पोलिस बांधवांवर, त्यांच्या कुटूंबीयांवर आणि त्यांच्या आयुष्यावर झाला त्याला जबाबदार कोण हा फार गहन आणि अनुत्तरीत प्रश्न उरतो.

क्रिया आणि त्यावरच्या प्रतिक्रीया ह्यावरच आपलं आयुष्य चाललेलं आहे. व्यक्त होणं ही खरं तर एक अंतर्मुख होण्याची बाब आहे. प्रत्येक प्रसंगी आपण कसे व्यक्त होतो, त्यावर समोरच्या व्यक्तीची आपल्याकडे पाहण्याची दृष्टी ठरते. आपल्याबद्दलचं मत तयार होत असतं. किंबहुना त्यावर आपली समोरच्या व्यक्तीवर एक अमीट अशी छाप पडल्याशिवाय राहत नाही. रोजच्या आयुष्यातल्या घटना त्यावर आपल्याकडून येणाऱ्या प्रतिक्रीया, त्याचे आपल्या आयुष्यावर, आपल्या संबंधीतांवर परिणाम होत असतात. ह्यामध्ये शांत आणि संयतपणे व्यक्त होणारी व्यक्ती हीच अनुकरणीय ठरते.

आयुष्य हे सुंदर आहेच पण ते अधिक सुंदर आणि अनुकरणीय, आदर्शवत करण्यासाठी मला आत्यंतिक महत्वाची वाटणारी बाब म्हणजे व्यक्त होणं. त्यामूळे व्यक्त व्हा... पण जपून...

इती लेखनसीमा.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

Thursday, 20 August 2020

आयुष्य कोरोना पश्चातचे...

नमस्कार मित्रांनो,

 

मी लिहीत असलेला हा पहिलाच ब्लॉग.

 

            कदाचित ह्या लेखाचं शिर्षक वाचून असं वाटेल की, ह्या सद्गृहस्थाच्या विश्वातून कोरोनाने मुक्काम आटोपता घेतला की काय? किंवा ईतर काही... खरं तर तसं काहीच नाही. सुरूवातीला जगभर असलेल्या टाळेबंदीमूळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. माझ्यासारख्या अनेकांचे व्यवसाय ठप्प झालेले आहेत. मागच्या चार/ सहा महिन्यांनी आपणा सर्वांना खूप काही शिकवलं. अगदी सुखनैव आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींपासून ते दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्यांपर्यंतच्या अशा सर्व स्तरांमधल्या प्रत्येकासाठी हा कसोटीचा काळ होता. गतीमान असं रोजचं अत्यंत धकाधकीचं आयुष्य अचानक ठप्प झालं. पायाला भिंगरी लागल्यासारखी पळणारी माणसं अचानक ह्या ईतक्या मोठ्या कालावधीसाठी घरांमध्ये कोंडली गेली. शाळा, महाविद्यालयं, कार्यालयं बंद झाली. सकाळी चालायला, व्यायामाला, खेळायला जाणारी आबालवृद्ध मंडळी सर्वांचाच दिनक्रम पूर्णतया बदलला. रोज बाहेरचं खाल्ल्याशिवाय दिवस जात नाही असं असणारी माणसं रोज घरचं अन्न खाऊ लागली. हॉटेल्स, मदीरालयांमध्ये होणारी गर्दी बंद झाली. चित्रपट, नाट्यगृह सगळं - सगळं बंद... एकंदरीतच आपलं ज्या ज्या गोष्टींवाचून अडतं... असं आपल्याला वाटतं... तसं प्रत्यक्षात नसतंच ह्याची जाणीव कोणत्या न कोणत्या स्वरूपात आपणा सर्वांना झाली.

 

            सध्या गणपतीचा सण अगदी तोंडावर आला आहे. पहायला गेलं तर बाजारात मरणाची (अगदी मरणाचीच) गर्दी आहे. एक व्यावसायिक म्हणून सांगायचं तर, म्हणावा असा व्यवसाय नाही. निसर्गाचं म्हटलं तर तो त्याच्या प्रकृतीला साजेसा वागतोय... बेभरवशी... सध्या तर ओला दुष्काळ पडेल की काय अशी संभावना आहे. आमच्या चिपळूणमध्ये तर किमान दोनदा पुरपरिस्थिती उद्भवली होती. एकंदरीतच साऱ्या परिस्थितीचा विचार केला तर ह्या कोरोनाच्या महामारीच्या कहरामूळे अत्यंत निराशाजनक वातावरण झालं आहे. तज्ञ मंडळींच्या मताप्रमाणे अपवाद वगळता, हा काही जिवघेणा आजार नाही. पण एकंदरच सर्वत्र प्रसारमाध्यमांमधून जे निराशाजनक वातावरण तयार करण्यात आलं आहे त्यामूळे, दूर्दैवाने ज्यांना कोरोनाची लागणं झाली आहे असे लोक, मोठ्या शहरांमध्ये रूग्णांची परवड होत असल्याच्या ज्या बातम्या ब्रेकींग न्यूज च्या नावाखाली सतत दाखवल्या जातात, त्याने प्रचंड प्रमाणात घाबरून जात आहेत. माझ्या ओळखीमधल्या काही व्यक्तींना दुर्दैवानं कोरोनाची लागण झाली. परंतू त्यांच्या मृत्युचं कारण हे कोरोना नसून, हृदयक्रिया बंद पडणं आदी अनेक कारणं आहेत. ह्या सर्वातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मानसिक बळाची आत्यंतिक गरज आहे. आपल्या माहितीमधील कोणी कोरोनामूळे आजारी पडलं तर, अशा कुटूंबाला जवळपास वाळीतच टाकण्यासारखे प्रकार होतात ते बंद व्हायला हवं. मा. पंतप्रधानांनी सुरक्षित अंतर ठेवून वावरण्याचं केलेलं आवाहन गांभिर्याने घेण्याची गरज आहे. आजाराची लागण झाली की रूग्ण दगावणारंच आहे असं नसून, आपल्या जवळचे तज्ञ डॉक्टर / आयुर्वेदिक वैद्य ह्यांच्याकडच्या उपचारांनी तो रूग्ण बरा होतो हा विश्वास त्याला देणं आवश्यक आहे. ह्या निमीत्ताने शोले चित्रपटातला एका पात्राच्या तोंडी असलेला एक संवाद ह्या बाबतीत अत्यंत समर्पक आहे. तो संवाद असा आहे की, जो डर गया... समझो मर गया.

 

            अजूनही परिस्थितीमध्ये आश्वासक सुधारणा नाही. तरी त्यातल्या त्यात दिलासादायक बातमी म्हणजे, बहुतेक देशांमध्ये ह्या आजारावर इलाज म्हणून शोधली जात असलेली लस संशोधनाच्या अंतिम टप्यात आहे. आता काय झालंय ह्यापेक्षा कोरोनाकाळापश्चात आपण आपलं आयुष्य कसं मार्गी लावू शकू ह्यावर विचार होणं आवश्यक आहे. आचार-विचारांमध्ये सकारात्मकता अंगीकारली तर, आपलं पुढंच आयुष्य आनंदामध्ये व्यतीत होऊ शकेल.

 

            सरतेशेवटी जनतेच्या सोयीसाठी आपल्या घरादाराची पर्वा न करता, राबणाऱ्या आरोग्य यंत्रणा, पोलिस कर्मचारी, विवीध सामाजिक संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असंख्य कार्यकर्ते ह्या सर्वांचे आभार व्यक्त न करता आपण करीत असलेल्या कार्याच्या ऋणात राहणं मी योग्य समजेन.

 

इति लेखनसीमा.

 

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥