आप्तस्वकीयांच्या निधनाची वार्ता पूर्वी प्रत्यक्ष भेटून वा
दूरध्वनीद्वारे निरोप देऊन समजत असे. आता भ्रमणध्वनी तसंच व्हॉट्स ऍप, फेसबूक सारखी समाजमाध्यमं रूढ झाल्यापासून एक
चांगली सोय झाली आहे. परंतू त्याचबरोबरीनं एक नवाच प्रकार बोकाळला आहे. आपण म्हणाल
की आता काय झालं? तर झालंय असं की,
मध्यंतरी सहज फेसबुक चाळतांना एका सुशिक्षीत
व्यक्तीने सामाईक केलेली बातमी वाचनात आली की, --- ह्या व्यक्तीच धक्कादायक निधन. पूढे लिहीलं होतं की,
RIP. बरं ज्याच्याबाबतीत ही
घटना ती व्यक्ती आणि हे लिहीणारी व्यक्ती आणि हे दोघेही हिंदू. वानगी दाखल आपण
आपल्या व्हॉट्स्ऍपच्या कोणत्याही समुहामध्ये कोणी निधन वार्ता कळविल्यावर इतर समुह
सदस्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रीया वाचल्यात की मला ह्याबाबतीत काय सुचवायचं आहे ते
आपल्या लक्षात येईल.
तसं तर आपण कोणाला कशी श्रद्धांजली द्यावी हा विषय खरं तर
वैयक्तिक आणि भावनिक देखील आहे. वैयक्तिक ठीक आहे परंतू भावनिक कसा? तर, बाब अतिशय साधी आहे. आपण ज्या हिंदू संस्कृतीमध्ये वाढलो, आपल्या ज्या मान्यता आहेत त्याप्रमाणे मृत्यु
हा शेवट नाही तर, मृत्युपश्चात
कर्मानुरूप, त्या ज्योतीस्वरूप अशा
जीवात्म्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. त्या व्यक्तीची पूर्वकर्म, प्राप्त आयुष्यात केलेली कर्म तसंच पुर्वसंचित
ह्या सर्व बाबींवर त्याची पुढची गती अवलंबून असते. अधिकारी व्यक्ती, संत-महात्मे यांच्या व्यतिरीक्त आपणापैकी
कोणीही त्याबाबत भाष्य करण्यास योग्य नाही असं माझं मत आहे. अशा वेळेस आपण काय करण
योग्य ठरू शकेल की, मृत्यु झालेल्या
व्यक्तीच्या करीता आपण सदिच्छा व्यक्त करणं. ह्या सदिच्छा काय हव्यात की,
"--- ह्या व्यक्तीच्या दुःखद
निधनाची वार्ता समजली. मी माझ्या --- ह्या आराध्य दैवताकडे/ माझ्या ---
सद्गुरूंकडे त्या व्यक्तीच्या आत्म्यास सद्गती मिळावी अशी प्रार्थना करतो."
ह्याची दुसरी बाजू एका छोट्याश्या उदाहरणावरून सहज लक्षात
येईल ती बाब अशी की, आपण एखाद्या
खोलीमध्ये आहो. काही कालावधीनंतर आपल्याला तेथून बाहेर जायचे आहे. परंतू दारामध्ये
एक व्यक्ती बसली आहे. जी आपल्याला बाहेर जाऊ देत नाही. तर आपण काय करू? आधी त्या व्यक्तीला आपण समजावू. तरीदेखील
त्याने आपणास जाऊ दिलं नाही तर आपण येनकेनप्रकारे आपली सुटका करण्याचा प्रयत्न करू
ह्या आपल्या प्रयत्नांमध्ये आपल्याकडून त्या अडवणूक करणाऱ्या व्यक्तीला काही हानी/
त्रास होईल का हा विचार आपण त्यावेळेस करणार नाही. त्याच प्रकारे एका
जीवात्म्याच्या वाटेमध्ये आपल्या ईच्छांचा काही बाध होईल का? याचा विचार ज्याने त्याने करायचा आहे.
इती लेखनसीमा...
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
No comments:
Post a Comment